औरंगाबाद – लोकसभा निवडणुकीला काही महिने राहिले असताना भाजपनेत्यांच्या मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावला जात आहे. दुसरीकडे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात फक्त रस्त्यांची डागडुजी करुन शिवसेनेच्या मतदारसंघांची बोळवण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत असल्याचे चित्र आहे. त्यासोबतच खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेतील बैठकीलाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हजर राहात नसल्याने त्यांचा तिळपापड झाला आहे. अधिकारी भाजपचे मांडलिक झाल्याचा आरोप करुन खैरे यांनी गैरहजर अधिकाऱ्यांची तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे करणार असल्याचे म्हटले आहे.
खासदार खैरेंना एवढा संताप
का आला?
खासदार खैरे यांच्या
अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला सार्वजनिक
बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण गैरहजर होते. चव्हाण यांची
अनुपस्थिती खासदार खैरेंच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना
त्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. मात्र
एक अधिकारी गैरहजर राहिल्याने खैरेंना एवढा संताप का आला, यासंदर्भात ‘सांजवार्ता ऑनलाईन’ने खैरे यांच्यांकडेच
विचारणा केली. ते म्हणाले, ‘औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांची कामे संथ गतीने
सुरु आहेत. खुलताबादहून म्हैसमाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर फक्त खडी टाकून सार्वजनिक
बांधकाम विभागाने या रस्त्याची बोळवण केली. याउलट जालना-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मात्र कामांचा धडाका
लावला आहे. फुलंब्री विधानसभा मतदारसंघात कोट्यवधींची कामे सुरु आहेत. हा दुजाभाव
मी सहन करणार नाही.’
अतुल चव्हाण यांची तक्रार
गडकरींना करणार
खासदार खैरे म्हणाले, ‘विकास कामामध्ये होत असलेला दुजाभाव सहन केला जाणार नाही. याची तक्रार केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली जाईल.’ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांची पत्नी भाजपमध्ये असल्यामुळे विकासाची गंगा ते फक्त भाजप नेत्यांच्या मतदारसंघात वाहात असल्याचा आरोप खासदार खैरेंनी केला. ते म्हणाले, अतुल चव्हाण यांची लेखी तक्रार मी गडकरींकडे करणार आहे. मतदारसंघात कामे होत नाही म्हणून खासदार खैरंची तक्रार आहे की भाजपनेत्यांच्या मतदारसंघात कामे होत असल्यामुळे यांचा पोटशूळ उठला आहे असा प्रश्न निर्माण होत आहे.












